Sunday, October 20, 2013

काहीतरी चुकत गेले..!Marathi Kavita

अनेकदा विचारला तिला
पण तिच्याकडे उत्तर नसे
मग तुकड्या तुकड्याने
माझे मलाच ते सुचत गेले.
...काहीतरी चुकत गेले..!

दिवस होत मंतरलेले
चिंब भिजण्याचे,बुडून जाण्याचे,
आनंदात ,एकमेकात
तरी मिठीत काही काहीसं खुपत गेले
...काहीतरी चुकत गेले..!

दिवस होते उमेदीचे
चिवचिवत कड्या जमवण्याचे
घरटे बांधण्याचे
कळस गाठण्या आधी घर जर खचत गेले
...काहीतरी चुकत गेले..!

काय घडले कोण चुकले
पडत मात्र गेली शकले
मौनाचे वास्तव ओठांवरती वाढत गेले
अन पाणी हळू हळू डोळ्यात भरत गेले
...काहीतरी चुकत गेले..!

रचनाकार - दत्तात्रय वाघ